नाट्य विद्यालय :
संस्थेच्या स्थापनेपासून १९३० सालापर्यंत संस्था नावाजलेल्या नाटकांचे प्रयोग बसवून ते सादर करून लोक मनोरंजन करणे व त्या द्वारा निरनिराळ्या
संस्थाना आर्थिक मदत करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काम करीत होती. १९३५ मध्ये, २६ वे भारत नाट्य संमेलन पुण्यात भरले होते त्यामध्ये संस्थेने
एक नाट्य शिक्षण वर्ग सुरु करावा व त्याला जनतेने साथ द्यावी असा ठराव एकमताने मंजूर केला होता. परंतु ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी
१९६२ साल उजाडले. १९६२ साली सौ. विमलाबाई साठे यांच्या नेतृत्वाखाली नाट्यशिक्षण वर्ग सुरु झाला. पण दीड दोन वर्षातच हा प्रयत्न तोकडा पडला.
परंतु त्यानंतर १९६६ सालापासून नाट्यसमीक्षक डॉ. रा. शं. वाळिंबे व श्री. प्रभाकर गुप्ते यांनी हा वर्ग नियमाने चालू केला व आजतागायत संस्थेचा हा उपक्रम
यशस्वीपणे चालू आहे. श्री. गुप्ते यांच्यानंतर राजाभाऊ फडणीस, जयंतकुमार त्रिभुवन, यांनी या वर्गाचे व्यवस्थापन उत्तमपणे सांभाळले.
रंगभूमीवर प्रवेश करणाऱ्या नवोदित तरुण, तरुणींसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नाट्यशिक्षण या वर्गामध्ये दिले जाते. भारतमुनींचा चतुर्विध अभिनय व रशियन
नाट्यतत्ववेत्ता स्टेनिस्टॅाव्हेस्की यांचे मानस्तंभ यांचा समन्वय साधून शारीरिक, बौद्धिक व मानसिक अशा तीन विभागात हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. शरीर
यंत्रणेची सर्वसामान्य माहिती, शास्त्रशुद्ध व श्वास घेण्यासाठी लागणाऱ्या इंद्रियांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासने, दीर्घ श्वसन, स्वरतंतूंचा
यथायोग्य वापर व त्यातून भरदार ध्वनीनिर्मिती करण्यासंबंधी प्राथमिक धडे प्रात्यक्षिकामधून दिले जातात. याशिवाय अभ्यासक्रमात संस्कृत, मराठी, इंग्रजी
रंगभूमीचा विकास, इतिहास, कला विषयक, विचार प्रवाहांची प्राथमिक माहिती, इतर ललित काळाच्या प्राथमिक घटकांची माहिती करून दिली जाते.
रंगमंचाचा भुगोल, नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय याशिवाय नाटकाची तांत्रिक अंगे ज्यामध्ये ध्वनी नियंत्रण, प्रकाश योजना, मेकअप, नेपथ्य, वेशभूषा
या सर्व बाबींचे प्राथमिक धडे दिले जातात. त्या त्या क्षेत्रातील नामवंत तज्ञांना बोलवून त्यांची या विषयातील मते व मार्गदर्शन वर्गातील प्रशिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. सहा महिने चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गातून आज हजारो विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. कित्येक जण उत्तम नट
म्हणून रंगभूमीवर स्थिरावले आहेत. काही जण नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनी नियंत्रण यासारख्या तांत्रिक बाबींमध्ये निष्णात झालेले आहेत. संस्थेच्या
नाट्यविद्यालयातर्फे घेतला जाणारा हा प्रशिक्षण वर्ग अभ्यासक्रमाचा योग्य चौकटीत बसवून तो एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाशी जोडण्याचा संस्थेचा मनोदय
आहे. यावर्षी अभ्यासक्रमाची बांधणी सुरु झालेली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या लायब्ररीमध्ये सभासदत्व दिले जाते, ज्यायोगे नाट्यशास्त्रावरील
विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भ ग्रंथ त्यांना वाचता यावेत, अभ्यासात यावेत. रंगभूमीवरील उत्तमोत्तम व ज्येष्ठ रंगकर्मींनी या प्रशिक्षण वर्गास भेट देउन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.
Top