जन्म : १३/८/१८९८ मृत्यु : १३/६/१९६९
एक थोर शिक्षणतज्ञ, समर्थ नाटककार, निर्भीड टीकाकार, पत्रकार, प्रतिभावान कवी, आद्य विडंबनकार, महान साहित्यिक, पटकथा लेखक, झुंजार
राजकारणी, उत्कृष्ट विनोदी वक्ता अशा अनेक पैलूंनी परिपूर्ण असे हे व्यक्तिमत्व.
‘बालमोहन नाटक मंडळी’चे चालक दामुअण्णा जोशी यांनी आपल्या कंपनीसाठी अत्रेंकडून ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक लिहून घेतले आणि ते
रंगभूमीवर १०/५/१९३३ साली आणले. हेच यांचे पहिले सुंदर विनोदी नाटक. नंतर १९५० पर्यंत म्हणजे ‘बालमोहन नाटक कंपनी’ बंद पडेपर्यंत
त्यांची एकूण ९ नाटके रंगमंचावर आली. ‘साष्टांग नमस्कार’ (१९३३), ‘घराबाहेर’ (१९३४), ‘भ्रमाचा भोपळा’ (१९३५), ‘उद्याचा संसार’ (१९३७),
‘लग्नाची बेडी’ (१९३६), ‘वंदे मातरम्’ (१९३७), ‘मी उभा आहे’ (१९३९), ‘जग काय म्हणेल?’ (१९४६). १९३८ साली ‘नाट्यकला प्रवर्तक’ नाटक
कंपनीसाठी ‘पराचा कावळा’ हे विनोदी नाटक लिहिले.
गाजलेल्या काझी खटल्यावर आचार्य अत्रे यांनी ‘तो मी नव्हेच’ हे नाटक रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतनने’ रंगभूमीवर आणले (१९६२). त्यानंतर १९६३
मध्ये ‘अत्रे थिएटरर्स’ ही नाट्यसंस्था काढली आणि ‘मोरूची मावशी’ (१९६३), ‘बुवा तेथे बाया’ (१९६४), ‘मी मंत्री झालो’ (१९६६), ‘डॉ. लागू’’
(१९६७), ‘प्रीतीसंगम’ (१९६८) आणि ‘ब्रह्मचारी’ (१९६९) ही नाटके रंगभूमीवर आणली. मराठी रंगभूमीवर १९३३ ते अगदी १९६९ पर्यंत अगदी समर्थपणे
आपल्या लेखणीने त्यांनी अधिराज्य केले.
मराठी रंगभूमीवर एवढ्या मोठ्या कालखंडानंतर आपल्या नाटकाचा प्रभाव असणारा दुसरा नाटककार अपवादानेच आढळेल. समाजातील ढोंग आणि व्यंग
दिसेल त्याचे दर्शन घडवणारे – ‘साष्टांग नमस्कार’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘लग्नाची बेडी’, ‘ब्रह्मचारी’ सारखी नाटके किंवा समाजावर टीका करणारी, समाज
सुधारणा विषयक –‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘जग काय म्हणेल’ यासारखी नाटके काय किंवा समाजात घडलेल्या घटनांवरील न्यायालयीन नाटके ‘तो मी
नव्हेच’, ‘डॉ. लागू’, अशी अनेक नाटके रंगभूमीवर कायम स्मरणात राहतील.