About us

भरत नाट्य संशोधन मंदिर

१८९४ सालात कै. दत्तात्रय आत्माराम ऊर्फ दादासाहेब फाटक यांनी आपल्या काही जोडीदार नाट्यप्रेमी सहाध्यायांच्या मदतीने, पुण्यातल्या त्यावेळच्या विश्रामबाग वाड्यातल्या त्यांच्या हायस्कुलात, शिक्षकांच्या संपूर्ण परवानगीने, एक नाट्यसंघ स्थापन केला. त्या सर्व हौशी विद्यार्थ्यांनी आपल्या संघाला नाव दिले ‘स्टुडंटस सोशल क्लब’. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे असे इंग्रजी नाव देण्यात कुणालाच काही, गैर अगर चमत्कारिक वाटले नव्हते. त्यावेळच्या ‘विश्रामबाग वाडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत सरकारी हायस्कूल होते. हा वाडा शनीचे पाराच्या उत्तर बाजूस काही अंतरावर आहे. या वाड्यात हल्ली पुण्यातल्या पोलीस खात्याची कचेरी व काही पोलीस स्टेशने आहेत. १८९४ सालात ‘स्टुडंटस सोशल क्लब’ ही हौशी नाट्यकलावंतांची नाट्यसंस्था पुण्यातल्या हायस्कूलात स्थापन झाल्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातच त्यावेळच्या बुधवार पेठेतील सरकारी हायस्कूल जवळच असलेल्या ‘भुसारी’ यांच्या वाड्यातली एक खोली संस्थेसाठी भाड्याने घेतली. पुढच्या सालातच म्हणजे १८९५ सालच्या दसऱ्याच्या रात्री, विद्यार्थी सभासद कलावंतानी ‘हॅम्लेट’ नाटकाचा पहिला अंक आणि त्याच्या जोडीस संस्थेचेच एक तरुण सभासद कै. गोपाळराव वाड यांनी स्वतः लिहिलेल्या ‘कृष्ण-कृत्य-प्रदीप’ या नावाच्या पौराणिक कथेवरील नाटकाचा एक अंक, असे एकूण दोन नाटकांचे प्रत्येकी एक एक अंक करून ‘स्टुडंटस सोशल क्लब’ या नाट्यसंस्थेच्या नाटकी संसाराला, त्या भाड्याने घेतलेल्या भुसारी वाड्यातल्या छोट्या जागेत मोठ्या उत्साहाने सुरुवात केली. त्या नाट्यप्रयोगासाठी पडदे, संस्थेच्या बालसभासदांनी घरून आणलेल्या जुन्या धोतर लुगड्यांचे केलेले होते आणि ‘कृष्ण-कृत्य-प्रदीप’ व ‘हॅम्लेट’ या त्या नाट्यप्रयोगासाठी उजेड होता, उसनवार आणलेल्या रॉकेलच्या दिव्यांचा! नाट्यप्रयोगात सूत्रधार नटीचा प्रवेश होताच. सूत्रधार होते कै. रामचंद्र नारायण पराड आणि नटी होत्या, संस्थेचे संस्थापक कै. दादासाहेब फाटक!!

त्या भुसारी वाड्यातल्या जागेत प्रत्यक्ष नात्याप्रयोगांची वरीलप्रमाणे सुरुवात केल्यानंतर स्टुडंट सोशल क्लबने थोड्याच दिवसात स्थलांतर केले. हल्ली पुण्यातले सिटी पोस्ट ऑफिस बुधवार पेठेत ज्या ठिकाणी आहे, त्याचा समोरच श्रीकृष्ण टॉकीज रस्ता आहे. त्या रस्त्याने पूर्व बाजूस जाणारा ढमढेरे बोळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका जागेत श्री. थत्ते यांचे राममंदिर होते. मंदिराच्या भोवती ओवऱ्या असून त्याच्यावर माडी ही होती. संस्थेने श्री. थत्ते यांच्याकडून एक ऐसपैस माडी भाडयाने घेतली. ती सात खणी होती. आणि भाडे होते, दरमहा एकोणीस आणे. नाटकी मंडळींच्या तालमी वगैरेचा आरडाओरडा चालू राहणार म्हणून भाडे जरा मुद्दामच जास्त आकारण्यात आले होते.

त्यावेळी संस्थेची सभासद-वर्गणी होती, महिना नऊ पैसे (जुने आणे) आणि तीही सवडीनुसार देण्याची मुभा सभासदांना होती. संस्था या नव्या प्रशस्त जागेत आल्यानंतर संस्थेने स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःच्या मालकीची, दीड रुपया खर्चून एक सतरंजीवजा कोरी चटई विकत घेतली. बुधवार पेठेतल्या ढमढेरे बोळातल्या त्या थत्ते राममंदिराच्या जागेत संस्थेने पुष्कळ नाट्यप्रयोग केले. ‘झुंजारराव’, ‘फाल्गुनराव’, ‘दुर्गा’, ‘कांचनगडची मोहना’ अशा नाटकांचे हौशी प्रयोग त्यावेळी त्या जागेत करून दाखवण्यात आले. प्रेक्षक मुददाम आमंत्रणे देऊन आग्रहाने बोलावले जात आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने चालवलेल्या त्या नाट्यसंस्थेस प्रोत्साहन मिळावे म्हणून कै. तात्यासाहेब केळकर, कै. नाट्याचार्य खाडिलकर, कै. शिवराम महादेव परांजपे अशी थोर नाट्यप्रेमी रसिक मंडळी मुददाम उपस्थित राहून त्या शालेय नाट्य कलाकारांचे आपुलकीने कौतुक करीत.

जसा जसा काळ पुढे पाऊल टाकू लागला तस तसे त्या नाविन्यपूर्ण नाट्यसंस्थेत नव्या नव्या हौशी सुशिक्षित नाट्यकलावंतांची भर पडू लागली. हौशी सुशिक्षित विद्यार्थी नाट्यसंस्था निर्माण करून ती चांगल्या तऱ्हेने चालवू शकतात ही त्या काळात एक अपुर्वाईच होती. संस्थेच्या स्थापनेनंतर दहाव्याच वर्षी संस्थापक कै. दादासाहेब फाटक एल्.एल्.बीची परीक्षा पास होऊन वकील झाले. हौशी नट आणि एका हौशी कलावंतांच्या नाट्यसंस्थेचा संस्थापक, वकील झाला या घटनेमुळे संस्थेला व हौशी कलावंतांना मान्यता मिळू लागली. नाटक्या परीक्षा पास होऊ शकतो, ही समाजाला मोहित करणारी सत्यकथा होती. हा १९०४ सालचा काळ होता. संस्थेच्या हौशी नाट्यप्रयोगात काम करणाऱ्या त्यावेळच्या कलावंतांची आणखी काही नावे या ठिकाणी देण्यासारखी आहेत. सर्वश्री चौबळ, अभ्यंकर, पिंपळे, कोकनूर, दिक्षित, अळकुटकर, अळेकर, विष्णुपंत पटवर्धन, खांबेटे, एन्.डी. ओक, यशवंतराव जठार अशी किती म्हणून नावे लिहावी?

१९०४ सालात पुण्यात कॉन्ट्रॅक्टर दातार या प्रसिद्ध कुटुंबातले एक तरुण हौशी गृहस्थ कै. वि.न. उर्फ भाऊसाहेब दातार, संस्थेचे सभासद झाले व संस्थेच्या कार्यात तन्मयतेने भाग घेऊ लागले, त्याचप्रमाणे याच सुमारास सर्वश्री कै. अप्पासाहेब गोखले, कै. दत्तोपंत काळे, कै. आर.डी. गोखले असे तरुण नाट्यकलावंतही संस्थेत सामील झाले. कै. आप्पासाहेब गोखले व कै. आर.डी. गोखले स्त्री भूमिका करणारे होते अन कै. दत्तोपंत उर्फ दादा काळे हे प्रथम स्त्री भूमिका व नंतर रुबाबदार पुरुष भूमिका करणारे होते. यांच्या मागोमाग कै. डी. एल. उर्फ दत्तोपंत परांजपे आणि कै. रावसाहेब जोगळेकर यांचा संस्थेत प्रवेश झाला. कै. दत्तोपंत परांजपे हे पुण्यात कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करीत. सिनेदिग्दर्शक राजा परांजपे यांचे हे वडील! त्यांना गायन कलेचा षौक होता. जोगळेकर हे कॉलेजात शिकणारे होते. कालांतराने हे ही एल्.एल.बी होऊन वकिलीचा व्यवसाय करू लागले.

१८९४ सालात स्थापन झालेल्या ‘स्टुडंटस सोशल क्लब’ या महाराष्ट्रातल्या आद्य हौशी नाट्यसंस्थेचे १९१३ सालात साधे ‘सोशल क्लब’ या नावात रुपांतर झाले. कारण संस्थेच्या सुरुवातीला खरोखरच विद्यार्थी (स्टुडंटस) दशेत असलेले संस्थेचे कलावंत आता वयाने व कर्तबगारीने मोठे होत होते. त्यांच्या जोडीस समाजातले इतर तरुण लोकही सामील होत होते. म्हणून मूळ नावातला पहिला ‘स्टुडंटस’ हा शब्द गाळून टाकणे योग्य व यथार्थ होते!

संस्थेचे सर्व सभासद कै. दादासाहेब फाटक यांच्या प्रभावी मार्गदर्शनखाली, अत्यंत मेहनतीने व जबाबदारीने नाट्यप्रयोग बसवीत होते. त्यांचे अनंत प्रयोग मोठ्या वैभवाने थिएटरमधून करून दाखवीत होते. सत्वपरिक्षा, फाल्गुनराव, मानाजीराव, त्राटिका, मोहनतारा, संगीत सौभद्र, कीचकवध इत्यादी अनेक नाटके संस्थेच्या संग्रही तयारीने होती. हे नाट्यप्रयोग करून संस्थेने कित्येक सार्वजनिक संस्थांना आर्थिक मदत केली. नाट्यप्रयोग करून त्याचे उत्पन्न लोकोपयोगी संस्थांना अर्पण करण्याची सोशल क्लबची फार जुनी परंपरा आहे.

संस्थेत मोठ्या हौसेने काम करणाऱ्या कै. दत्तोपंत परांजपे कॉन्ट्रॅक्टर यांच्या कर्तबगारीच्या आधारावर १९२३ सालात सोशल क्लबने ढमढेरे बोळातल्या राममंदिरातली भाड्याने घेतलेली जागा सोडून दिली. काही दिवस मोरोबादादा वाड्यात कार्य केले आणि नंतर सध्या संस्था आहे त्या ठिकाणच्या वास्तूत संस्थेने स्वतःच्या मालकीच्या २४ x १८ फुट लांबी-रुंदीच्या हॉलमध्ये आपली कामगिरी सुरु केली.

हा हॉल कै. दत्तोपंतानी स्वतःच्या हिमतीवर इतर सभासदांच्या मदतीने बांधला. एक थोर रसिक कार्यकर्ते व जागेचे मालक कै. जोशी यांनी १९२३ सालात संस्थेला जागा दिली. संस्थेने स्वत:च्या हिमतीवर निर्माण केलेल्या या नात्यावास्तुत, १९३३ सालात कै. भाऊसाहेब दातार, त्यांचे चिरंजीव बंडोपंत दातार आणि सरकारच्या रेल्वे खात्यात काम करणारे कै. दादासाहेब काळे अशा तिघांनी इतर सभासदांच्या आपुलकीच्या सहाय्याने, दुपटीने वाढ केली. अशा तऱ्हेने संस्थेला स्वतःच्या मालकीचा सुमारे ५० x १८ फुट लांबी-रुंदीचा दक्षिणोत्तर हॉल उपलब्ध झाला. शिवाय पुढे व मागे तितक्याच रुंदीची काही मोकळी जागा होती. त्या ठिकाणी म्हणजे संस्थेचा नवा हॉल ओ पलीकडच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीचे दरम्यानच्या मोकळ्या जागेत, जागेचे मालक उपरोक्त कै. जी.व्ही. उर्फ रावसाहेब जोशी यांच्या कृपेने न्यू क्रीडाभवन क्लब या नावाचा एक टेनिस क्लब चालू होता. या टेनिस क्लबचे बहुतेक सर्व सभासद सोशल क्लबचे सभासद होते आणि जागेचे मालक कै. रावसाहेब जोशी यांचे या दोन्ही संस्थांवर पुत्रवत प्रेम होते.

कै. भाऊसाहेब दातार यांनी कै. अण्णासाहेब मराठे वकील, कै. अप्पा गोखले आणि प्रसिद्ध नाटककार कै. माधवराव ना. जोशी यांच्या सहाय्याने संस्थेतर्फे नाट्य चित्र-संशोधनाचे कार्यही मोठ्या हौसेने सुरु केले. मराठी रंगभूमीची सेवा करणारे नट, त्यांचे कार्य, त्यांचा जीवन वृत्तांत, त्यांची उपलब्ध छायाचित्रे, नाटकांची हस्तलिखिते, जुन्या अमोल नाट्यवस्तू, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या नाट्यविषयक लिखाणांची कात्रणे, नात्याग्रंथ इत्यादी नाट्यविश्वातल्या लहान मोठ्या चिजांचा संग्रह करण्याचे महान बिकट कार्य सुरु झाले! त्यांनी संस्थेची पिक्चर गॅलरी अगर चित्रसंग्रह निर्माण करण्यास सुरुवात केली. या कामात कै. भाऊसाहेब दातार यांना त्यांचे मामा पनवेलचे वकील कै. ह.ज. उर्फ दत्तोपंत मराठे आणि मुंबईचे सुप्रसिद्ध आर्टिस्ट कै. हरी केशव फडके यांनी मन:पूर्वक साहाय्य केले आहे आणि म्हणून याच सुमारास सोशल क्लब या नावाचे सोशल क्लब नाट्यसंशोधन मंडळ या नावात आपोआप योग्य व यथार्थ परिवर्तन झाले.

संस्थेच्या मोठ्या हॉलचे १९३५ सालात ओपन एअर थिएटर करण्यात आले. ही किमया मुख्यत्वे कै. भाऊसाहेब दातार यांच्या कर्तबगारीनेच प्राप्त झाली. या ओपन एअर थिएटरचे उद्घाटन संस्थेने ४ मे १९३५ रोजी पुण्याचे त्यावेळचे कलेक्टर मि. मॅकलॅक्लन यांच्या हस्ते केले. आणि त्या प्रसंगी संस्थेने आपल्या त्राटिका या हातखंडा नाट्यप्रयोगाचा खेळ करून दाखवला!

२५ मे व २६ मे १९३५ रोजी संस्थेमार्फत भारत नाट्य संमेलनाचे २७ वे अधिवेशन, थोर कलावंत माननीय कै. गोविंदराव टेंभे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या वरील हॉलमध्ये थाटाने साजरे करण्यात आले. स्वागताध्यक्ष होते संस्थेवर नितांत लोभ करणारे प्रा. श्री.ना. चाफेकर. संस्थेने रुबाबात साजऱ्या केलेल्या या संमेलनात संस्थेचे कै. भाऊसाहेब दातार, डॉ. न.का. घारपुरे, डॉ. य.गं. लेले, वगैरे सर्व सभासदांनी भाग घेतला होता. या संमेलनाचा समग्र वृतांत खुद्द कै. भाऊसाहेब दातार यांनीच १९३५ सालातच छापून प्रसिद्ध केलेला आहे.

याच सालात १३/१०/१९३५ रोजी मुंबईचे गव्हर्नर नेक नामदार लॉर्ड ब्रेबोर्न यांनी संस्थेस सपत्नीक भेट दिली. या प्रसंगी माननीय दत्तोपंत पोतदार यांचे संस्थेस मार्गदर्शन झाले होते आणि कै. तात्यासाहेब केळकर, श्रीमंत आबासाहेब मुजुमदार, प्रा. मालशे, कै. माधवराव जोशी, कै आबासाहेब आळकुटकर व इतर प्रमुख सभासद आपुलकीने हजर होते.

याच १९३५ सालात संस्था रजिस्टर झाली आणि तिला १८६० च्या २१व्या रजिस्ट्रेशन कायद्याप्रमाणे ता ८ जुलै १९३५ रोजी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देण्यात आले.

त्यानंतर संस्थेचे एवंगुण विशेष कार्य पाहण्यासाठी राजे-महाराजे, गव्हर्नर-कलेक्टर, थोर नागरिक, राजकीय पुढारी, सुप्रसिद्ध कलावंत अशा निरनिराळ्या स्तरातील सज्जनांनी भेटी देऊन संस्थेच्या कार्याबद्दल साभिमान समाधान व्यक्त केले आणि संस्थेचे नाट्यप्रयोग करण्याचे व नाट्यग्रंथ-चित्र-संशोधनाचे कार्य अधिक पुढे चालूच राहिले. या निर्मळ नि पवित्र नाट्यगंगौघाला अनेक कर्तबगार, हौशी नि प्रामाणिक कार्यकर्त्यांची चांगलीच साथ मिळत गेली.

२७/९/१९४४ रोजी संस्थेचा पन्नासावा वर्षाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. विजयादशमीला साजऱ्या झालेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थान साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर यांनी स्विकारले होते. या प्रसंगी ‘तोतयाचे बंड’ या नाटकाचा प्रयोग करण्यात आला.

संस्थेच्या इतिहासात प्रथमच संस्थेची घटना पद्धतशीर तयार करून छापून काढून ती दि. १५/८/१९५० पासून नाविन्यपूर्ण स्वरुपात अंमलात आली.

पुण्यात सोशल क्लब खेरीज इतर पुष्कळ हौशी नाट्यसंस्था कितीतरी कार्य करीत होत्या. या सर्व हौशी कलावंतांच्या संस्था एकत्रित आणण्याचा उपक्रम १९४१ सालात संस्थेच्या रंगमंदिरात ता २५ व २६ एप्रिल रोजी श्री. वि. ग. जोशी व बाबुराव विजापुरे यांनी घडवून आणलेला होता. त्याच कल्पनेवर १६ ते २० मे १९५१ पर्यंत सोशल क्लब तर्फे हौशी नटांचे स्नेहसंमेलन भरविण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्षपद नटवर्य केशवराव दाते यांनी स्वीकारले.

दि २६ जुलै १९५२ रोजी अमेरिकेतील कॅलीफोर्निया युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांनी संस्थेस भेट दिली.

निरनिराळ्या सार्वजनिक लोकोपयोगी संस्थांच्या मदतीसाठी संस्थेन अनेक नाट्यप्रयोग केले. १९४५ पासून ते २००३ पर्यंत संस्थेने केलेल्या अशा उपक्रमांची सूची आपणास पहावयास मिळेल.

ओपन एअर थिएटरनंतर १९६३ सालात एका हंगामी स्वरूपाच्या मंडप-थिएटरमध्ये संस्थेचे परिवर्तन झाले. या कामी रानडे कॉन्ट्रॅक्टर, बाबुराव विजापुरे, बंडोपंत दातार, बंडोपंत साठे यांचे अत्यंत प्रभावी मार्गदर्शन व अतुलनीय साहाय्य झाले. न्यू क्रीडा भवन क्लबच्या टेनिस कोर्टाची शेजारची मोकळी जागा यासाठी उपलब्ध करून घेणे जरूर होते. ही टेनिस क्लबची जागा मिळवण्याचे प्रचंड मोलाचे कार्य कै. बंडोपंत साठे यांनी, त्या क्लबच्या सर्व समंजस कार्यकर्त्यांच्या प्रेमळ सहकार्याने उत्तम तऱ्हेने पार पाडले.

या मंडप थिएटरच्या प्रेक्षागृहात मांडव प्रथम भाड्याने उभा करण्यात आला होता. तो संस्थेने स्वतःच्या मालकीचा करावा असे संस्थेचे तरुण व तडफदार कार्यकर्ते श्री. श्रीकांत भिडे व सर्वश्री काका दाते, अप्पा ताम्हणकर, मेहेंदळे इत्यादींच्या प्रेरणेने ठरविण्यात आले आणि थोड्याच दिवसात ही उपयुक्त व आर्थिक फायद्याची कल्पना कार्यवाहीत आणली गेली. हे मंडप-थिएटर अत्यंत प्रभावीपणे चालविले गेले. थिएटर चालवणे हे कार्य साधे नाही. टे एक बिकट शास्त्र बनलेले आहे. पण संस्थेच्या सर्वश्री बाबुराव विजापुरे, श्रीकांत भिडे, पराड बंधू, दाते मंडळी, अप्पा ताम्हणकर, मकरंद केळकर, बाबा साठे, प्रभूती सभासदांनी ही प्रचंड व बिकट कामगिरी मोठ्या प्रतिष्ठेने पार पाडून संस्थेला नावलौकिक व द्रव्य साहाय्य मिळवून दिले. लक्षावधी नाट्यरसिकांचे व शेकडो नात्यासंस्थांचे संस्थेस प्रेम मिळाले!! हे मंडप थिएटरही शक्य तितक्या लवकर बदलणे भाग होते. त्यासाठी संस्थेच्या एकंदर इमारतीत योग्य ती वाढ करण्याचे ठरवण्यात आले. मांडव काढून टाकून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे पक्के कायम स्वरूपाचे सुंदर, सर्व सुखसोयींनी उपयुक्त असलेले असे प्रेक्षागृह बांधणे जरुरी होते. त्याखेरीज हल्ली स्टेज (रंगमंच) असलेल्या दोन्ही बाजूस तीन मजले बांधणे अनेक तऱ्हेने संस्थेस उपयुक्त होईल असे ठरले. यासाठी मूळ टेनिसकोर्ट असलेली जागा त्याचे मालक माननीय जोशी बंधू व त्यांच्या चिरंजीवांकडून संस्थेने १६ ऑगस्ट १९६९ रोजी ४९,४५१ रुपयात रजिस्टर्ड खरेदीखत करून घेऊन विकत घेतली.

१९६९ सालात संस्थेने कै. राम गणेश गडकरी या श्रेष्ठ नाटककाराच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त एक व्याख्यानमाला डॉ. रा. शं. वाळिंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. वि. ग. जोशी यांच्या सहाय्याने आयोजित केली होती. त्यास पुणेकर नाट्यरसिकांनी उत्तम साथ दिली.

संस्थेने १९६९ साली पाऊणशे वर्षे पूर्ण होऊन अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. जणू भारत नाट्य मंदिराच्या कुंडलीत अमृतसिद्धी योग आला. मोठमोठी मंडळी कुणा ना कुणाच्या आग्रहाने मंडळास भेट देऊ लागली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, अर्थमंत्री वानखेडे, महसूलमंत्री देसाई यांच्या भेटी झाल्या. मृछाकटिक, सौभद्र, मानापमान सारखी जुनी संगीत नाटके! तशीच नवी दुर्वांची जुडी, कट्यार काळजात घुसली अशी रंगताना लोकांनी पाहिली की प्रत्येकाने उत्स्फूर्त रितीने विचारणा केली – कायम रंगभवन का नाही बांधत?

संस्थेची अडचण इतरांना काय माहित. पण प्रत्येकाने सहानुभूतीचे शब्द ऐकवावे. प्रोत्साहन द्यावे. पुण्याचे कमिशनरद्वय-पोलिस कमिशनर श्री. मराठे मोठे रसिक. एक सुस्वभावी पण दक्ष अधिकारी संगीत नाटकांची त्यांना गोडी. दुसरे नगरपालिकेचे कर्तबगार भुजंगराव कुलकर्णी. त्यांनी तर जणू पानशेत नंतरचे पुणे सुंदर स्वयंपूर्ण बनविण्याचा ध्यासच घेतला होता. अशा मंडळीसमोर मंडळाची मागणी तेवढ्याच प्रभावीपणे मांडणारा कुणी प्रतिनिधी वकील संस्थेला हवा होता. मंडपात रंगणाऱ्या संगीत नाटकांना हटकून हजेरी लावणारे श्री. नरुभाऊ लिमये यांना बाबुराव विजापुरे यांनी हेरले.

आमदारांना नाटकांचे वेड. त्यांनी स्वतः विद्यार्थीदशेत नाटकात कामे केलेली. एवढी माहिती बाबुरावांना पुरेशी झाली. नरुभाऊ संस्थेकरता शब्द खर्चू लागले. ते शेवटी संस्थेचेच झाले आणि मंडळाची कुंडली बदलून गेली. अमृतमहोत्सव आपल्या मालकीच्या कायम वास्तूत साजरा करू अशी जणू सर्वांनी प्रतिज्ञा केली. एखादी परवानगी इतरांना मागून मिळणार नाही ती नरुभाऊ हक्काने आणून देऊ लागले. एकदा म्हणाले, ‘मंडळाबद्दल असलेली अपार सहानुभूती खुद्द मंडळातल्या लोकांनाच माहित नव्हती’. श्री आबासाहेब मुजुमदार या संस्थेचे अध्यक्ष, पंच्याहत्तर वर्षांची अविरत सेवा. श्री बाबुराव विजापुरे, श्री. गो. ल. आपटे आणि अनेक हौशी नट रंगभूमीवर नाटकी पण बाहेरच्या क्षेत्रात प्रतिष्ठित नागरिक. हे या संस्थेचे खरे भांडवल. ११ ऑक्टोबर १९६७ रोजी गृहखात्याने थिएटर बांधण्यास परवानगी दिली. नगरपालिकेचे कमिशनर भुजंगराव म्हणजे नोकरशाहीच्या पोलादी चौकटीच्या अगदी विरुद्ध. कोणत्याही गोष्टीत ‘नकार’ देणे फार सोपे पण रास्त योग्य गोष्टीत नियमांची फाजील आडकाठी येऊ न देता समाजाच्या गरजेची गोष्ट घडवून कशी आणावी हे त्यांचे धोरण. कोर्पोरेशनने आराखडा मंजूर केला. याच साली महानगरपालिकेत बहुसंख्य सभासद नव्या दमाचे नव्या नजरेचे निवडून आले. त्यांनी मान्यता दिली. सर्वांनी अनुमती दिली. आळीकर मंडळीनीही विरोध संपविला. संस्थेचे शेजारी टर अडचण सोसून मदतीस तयार झाले. भारत इतिहास संशोधन मंदिर, महाराष्ट्र एज्यु. सोसायटी, श्री. धोंडोपंत जोशी, सर्वांनी एकच सांगितले, एकमेकांस सांभाळून घेऊ या हं!

२७ जुलै १९६९ या सुमुहूर्तावर श्रीगजाननाच्या साक्षीने संकल्प सोडला. एकेमाकाने एकेक बाजू सांभाळली. सर्व गोष्टींच्या आरंभला हवी लक्ष्मी. तिच्या बळाविना कविचे पांडित्य फोल. विजापुरे सेक्रेटरी पराड, मांडववाले दाते, खुद्द अध्यक्ष आबासाहेब साऱ्यांचा विश्वास ठाम.

कार्यकारिणीने गेल्या चार सहा वर्षे कष्टपूर्वक जमविलेल्या निधीचे माहिती का. का. मंडळातर्फे सेक्रेटरी बा. का. पराड यांनी पहिल्याच सभेत सांगितली. नात्यागृह उभारणीची तयारी करा, एक लाख ऐंशी हजार रुपये संस्था, बांधकाम समितीच्या हाती देण्यास तयार आहे. त्याबरोबर अनेकांची आश्वासने. जणू परवानगी विना खोळंबले ल्या सहानुभूतीस उधाण आले. छोटे सभासद आपली मुठ जमवू लागले. कुणी मंडळींनी पाच सहा लाखाचा निधी उभारण्याबाबत चिंता व्यक्त केली. हेतू मोडता घालण्याचा नव्हता तर सावधानतेचा इशारा देण्याचा होता. पण प्रसंगी शुभारंभीच कुणी इशाऱ्यांचे बोल बोलला तर नाराजी येते. गैरसमज होतात पण इशारा आपले काम करत असतो. कर्तबगार माणसे हे आपणास आव्हान समजून कामाला लागतात. गोष्टी जुळत गेल्या म्हणजे साऱ्याच जुळतात. १९ मार्च १९६९ या दिवसाच्या मुहूर्तावर मंडळाची इमारत निधीची पावती पुस्तके छापून घेतली ती पेशव्यांच्या सारसबागेतल्या उजव्या सोंडेच्या गजाननासमोर ठेवून पहिली पावती फाडली. आज त्या पहिल्या अनेक पूज्ये चढली आहेत. सारखी माणसे जमू लागली. आमचे आर्किटेक्ट श्री. व्ही. बी. देशपांडे आमच्या नरुभाऊंच्या परिचयाचे, पण संस्थेला अपरिचित. त्यांच्याशी करार करताना आमचे कायदा सल्लागार रावसाहेब फडके कायदे कलमांची चर्चा करीत तेव्हा देशपांडे आपलेपणाने म्हणत, ‘या मंडळाच्या फाटक्या पडद्यामधून मी लहानपणी चोरून नाटक पाहत होतो. दीड अंक झाल्यानंतर कुणीतरी क्लबचे प्रतिष्ठित आम्हा मुलांना पिटात फुकट बसवत असत. या संस्थचे काम मी हौसेने करणार आहे. तुम्ही सांगाल त्या अटी मान्य!

२० जुलै १९६९ रोजी श्री. कृष्णराव फुलंब्रीकर यांचे हस्ते महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या ऊपस्थितीत आग्नेय दिशेच्या कोपऱ्यावर कुदळ मारली. सर्वाना आठवण झाली ती नटवर्य केशवराव दाते यांची. दहापंधरा वर्षापूर्वी केशवरावजींच्या सत्कार प्रसंगी जमलेल्या निधीतून त्यांनी सहा हजार रुपये मंडळाला दिले आणि सांगितले आपल्या मालकीचे नाट्यगृह बांधा! केशवरावजींनी तसे म्हणावे हे स्वाभाविक होते. ज्या पुण्यात गंधर्व, महाराष्ट्र, समर्थ, ललितकला अशा नाटक कंपन्यांनी माहेरी सुखासाठी येणाऱ्या सुवासिनी सारखे हक्काने यावे आणि तीन तीन महिने रसिकांनी त्यांना दाद द्यावी त्या पुण्यात एकही नाट्यमंदिर नाही. खंत होती सर्वाना.

सहा लाखाचे हे नाट्यमंदिर सहासात महिन्यात रूप धरू लागले. ऑगस्टच्या एक तारखेस पायाभरणी समारंभ झाला. मे महिन्याच्या नऊ तारखेस मंदिराचे उद्घाटन झाले. अजब योगायोग आहे. नऊ महिने नऊ दिवस! केव्हाही या कामाकडे नजर टाकावी. काही व्यक्ती हटकून दिसायच्या. बाबुराव विजापुरे यांच्या खांद्यावर अडकवलेली शबनम पिशवी, त्या पिशवीत काय काय सापडेल याचा अंदाज बांधणे कठीण. नव्या मंदिराच्या उभारणी संबंधी अनेक संदर्भ त्यात असतीलच पण त्या बरोबर जुने निरुपयोगी सामान कसोशीने विकून योग्य पैसे संस्थेला कसे मिळतील यापासून तो उद्या नाट्यमंदिर तयार झाल्यानंतर नाटके कोणती लावायची, कुणाकडून किती ठेव आणायची, नव्या नव्या कल्पनांनी जास्तीत जास्त लोकांचे हात या उभारणीचे कामात कसे लागतील याचे विचार बाबुरावजीचे मनात घोळत असत. त्यातूनच कल्पना निघाली ‘आसन’ देणगीची. भरत नाट्यमंदिरात चांगल्या फोम रबरच्या खुर्च्या हव्या. लोकांची मागणी. पण केवळ खुर्च्यांची किंमतच लाखाचे घरात जाते असे दिसताच बाबुरावजीनी कल्पना सुचविली की एकेका नटाने किमान एका खुर्चीची कींमत देणगी म्हणून द्यावी! कल्पना नाट्यसृष्टीत एकदम मंजूर झाली. पत्रावर पत्रे येऊ लागली “आमच्या नावे खुर्च्या ठेवा”. भरत नाट्य मंदिरावर प्रेम करणारे अनेक व्यावसायिक नट व नाट्यसंस्था पुढे सरकल्या. नाट्य संपदेने सांगितले कि पहिला मखमलीचा पडदा आमची देणगी. कितीही खर्च येवो. श्री प्रभाकर पणशीकर यांनी निरोप दिला, “रंगपटात दहावीस चांगले आरसे हवेत ते घ्या. ती माझी देणगी”. डॉ. काशिनाथ घाणेकर म्हणाले, खरोखर मंडळाच्या लोकांना गहिवर आला, आनंद दाटला. किती लोक प्रेम करतात या संस्थेवर!

असे भवन अशा रितीने साकार होत होते. बाबूरावजींच्या शबनम पिशवीच्या जोडीला नरुभाऊ लिमये यांची हातातली डायरी! त्यात अत्यंत गोष्टी नोंदलेल्या. सरकार दरबारीच्या परवानग्या, अडीअडचणी, देणग्या-अनुदाने मिळविण्याची गरज, कॉन्ट्रॅक्टा, आर्किटेक्ट, विद्युतीकरण, ध्वनिक्षेपण, खुर्च्यांची ऑर्डर अनेक गोष्टी एकदम चारी दिशांनी सुरु असतानाच नरुभाऊंनी एकदम जाहीर केले, मंदिराचे उद्घाटन नऊ मे रोजी आणि दहा तारखेस मंडळाचा अमृतमहोत्सव. साऱ्यांनी आपल्या नजरा त्यांच्याकडे रोखल्या. जागेवर नाट्यमंदिरासारखे काहीच उभे दिसत नसताना या माणसाने दिल्लीत गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांचेशी संपर्क साधून दहा तारीख ठरवूनही टाकली होती. ९ मे १९७० साली संस्थेचे आठशे पन्नास आसनांचे टुमदार रंगभवन उभे राहिले. संस्थेला या महत्वाच्या कालखंडात बाबुराव विजापुरेंसारखा अक्षरशः तन-मन-धनाने एकरूप झालेला नाट्यतपस्वी लाभला. जुन्या मंडळींचा मंदावलेला उत्साह कायम राखून नव्या नव्यांची जोड संस्थेला देणारा एक कुशल संघटक. संस्था सर्वांगाने विकसित होत गेली ती या तपस्वीच्या श्रमाने. संस्थेचा नाट्यचित्र संग्रह वाढला. नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरु झाले. संगीताचे सूर, नृत्याचे झंकार ऐकू येऊ लागले. आता तर संस्थेकडे स्वतःचे दिमाखदार नाट्यगृह होते. मग संस्थेच्या अनेक नवनवीन दिमाखदार नाट्यनिर्मितीला सुरुवात झाली.

संस्था महाराष्ट्र राज्याच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मराठी, हिंदी, संगीत नाट्य स्पर्धेमध्ये प्रयोग करू लागली. सन १९७० पासून नोंद घेता येईल अशा नाट्यकृती म्हणून संगीत स्वयंवर, सं. वैरीण झाली सखी, सं. सौभद्र, सं. मानापमान, संशयकल्लोळ, मत्स्यगंधा, मृच्छकटीक, सं. निशब्द, माजघरात या नाटकांचा उल्लेख करावाच लागेल.

कालानुरूप संस्थेच्या कामकाजात बदल अपेक्षित असतात. त्यानुसार संस्थेने घटना दुरुस्ती केली. कालानुरूप घटनेमध्य बदल झाले हे याचे वेगळेपण. संस्थेचे स्वतःचे नाट्यगृह असल्यामुळे बाहेरील हौशी संस्था त्यांच्या स्पर्धा संस्थेच्या नाट्यगृहात भरवू लागले. आज संस्थेमध्ये किंबहुना हौशी रंगभूमीवर मानाच्या अशा ठरलेल्या

  1. पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा,
  2. फिरोदिया करंडक,
  3. महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा,
  4. कामगार कल्याण केंद्राच्या कामगार नाट्य स्पर्धा,
  5. औद्योगिक ललितकला मंडळाच्या एकांकिका स्पर्धा, हिंदी राज्य नाट्य,
  6. संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा,
  7. लहान मुलांच्या नाट्य स्पर्धा,
  8. अलिकडेच पुण्यातील आंतर बँक चि. वि. जोग करंडक एकांकिका स्पर्धा,
  9. आराधना करंडक एकांकिका स्पर्धा,
या सर्व स्पर्धा आज संस्थेच्या नाट्यगृहात गेली अनेक वर्षे घेतल्या जातात.

हौशी रंगभूमीवरील कलावंतांना संस्थेची वास्तू आपली वाटते ती याच कारणामुळे. प्रत्येक हौशी संस्थेचा संस्थेशी असा ऋणानुबंध बांधला गेलाय. संस्थेच्या स्वतःचे असे उपक्रम ‘स्वस्त नाटक योजना’, सांस्कृतिक कार्यक्रम, वासंतिक संगीत महोत्सव, कै. वसुमती विजापुरे एकपात्री अभिनय स्पर्धा या सारखे उपक्रम आपल्या वेगळ्या वैशिष्ठ्यांसह आपला ठसा उमटवित आहे. आज या उपक्रमांची पंचवीशी साजरी होऊ लागली आहे. संस्थेने १९९४ साली शंभरी सोजरी गाठली. १८९४ ला लावलेल्या या रोपट्याचा खऱ्या अर्थाने वटवृक्ष झाला. शंभरीच्या निमित्ताने विविध उपक्रम, कार्यक्रम, स्मरणिका प्रकाशित करून गत आठवणींना उजाळा देईल. संस्थेच्या ११० वर्षे इतिहासाकडे नजर टाकली असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की, संस्थेच्या पूर्वार्धात संगीत नाटकांचा वैभवाचा काळ असताना संस्थेने गद्य नाटकांचे प्रयोग सातत्याने करीत गद्य नाटकांची परंपरा एका अर्थाने टिकविली तर आजच्या काळात गद्य रंगभूमी वैभवाच्या शिखरावर असताना संस्था संगीत नाटकांची परंपरा जतन करीत, अनेक संगीत नाटके, यामध्ये सं. मानापमान, सं. शारदा, सं. मत्स्यगंधा, सं. स्वयंवर, सं. कट्यार काळजात घुसली अशा नाटकांचे प्रयोग सातत्याने करीत संगीत नाटकांची परंपरा टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही परंपरा नुसतीच टिकविण्यापेक्षा तिच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न चालू आहे. संस्थेचे सभासद श्री. रवींद्र खरे यांनी लिहिलेले सं. निशब्द माजघरात या नाटकाची निर्मिती संस्थेने केली असून राज्य नाट्य स्पर्धा, नवी दिल्ली येथील महाराष्ट्र येथील नाट्य स्पर्धा येथे या नाटकाने अलौकिक यश संपादन केले आहे.

मराठी रंगभूमीवर गद्य व पद्य नाट्य परंपरा टिकविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे ही गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. संस्था या वर्षी शतकोत्तर दशक आरंभ वर्षात प्रवेश करती झाली. परत एकदा मागे वळून पाहत गतकालाचा, गतवैभवाचा आलेख पाहावा आणि नव्या तंत्रयुगात या वेबसाईटच्या माध्यमातून संस्था जगातल्या कानाकोपऱ्यात नेण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. शतकोत्तर दशकारंभ वर्षाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही तरुण कार्यकर्त्यांनी वेबसाईट या संकल्पनेचा पाठपुरावा करून संस्थेचा इतिहास या माध्यमातून आपणासमोर मांडला आहे.

Have a question or need any help?

Please contact - 020 2448 1614