संग्रहालय

बुकीश नाटके

विष्णुदास भावेंच्या कालखंडानंतर साधारणपणे १८६१ च्या दरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना होऊन महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षण सुरु झाल्यावर त्या शिक्षणाने जे काही परिणाम झाले त्यातील एक म्हणजे लोकांची बुकिश नाटकाकडील प्रवृत्ती वाढली. कॉलेजमध्ये शेक्सपिअर, कालिदास यांच्या नाटकाचा रसास्वाद जेव्हा उमजू लागला तस तसे इंग्रजी, संस्कृत नाटकाचे प्रयोग होऊ लागले. संस्कृत नाटकांची, इंग्रजी भाषेतील नाटकांची भाषांतरे होऊन पाश्चिमात्य रीतीरिवाज, आचारविचार यांच्याकडे मराठी रंगभूमीचा ओढा वाढला. विद्वान मंडळींनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची भाषांतरे किंवा रुपांतरे केली त्याचबरोबर स्वतंत्र नाटके मराठीत रचून नाटक मंडळींना शिकवली याचा मराठी रंगभूमीला उपयोग झाला व सुधारणा झाली.

बुकिश नाटकांकडे कल वाढविण्यास प्रामुख्याने ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’ कारणीभूत आहे. ‘वेणीसंहार’, ‘ऑथेल्लो’, ‘तारा’, ‘किंगलियर’, शंकरराव पाटकर हे नट ‘ऑथेल्लो’ नाटकातील ‘यागोची’ व्यक्तिरेखा खूप कमालीची करीत. बुकिश नाटकापासून पडदे, पोशाख, देखावे वैगरे या बाबतीत खूपच सुधारणा झाल्या. बुकीश नाटक संबंधाने सर्वात चांगले नाव मिळवलेली नाटक मंडळी म्हणजे ‘शाहूनगरवासी’ हीच होय. ‘त्राटिका’ हे नाटक शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ धी सरू’ या नाटकाच्या आधारावर रचलेले आहे. विनोदी व हास्यपूर्ण आहे. प्रोफेसर वासुदेवराव केळकर व शंकर मोरो रानडे यांच्या साह्याने ही मंडळी बुकीश नाटकाचे प्रयोग करीत असे. सामाजिक, ऐतिहासिक नाटकेसुद्धा या दरम्यान रंगभूमीवर आली. मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. स्वतंत्र पहिले ऐतिहासिक नाटक म्हणून ‘थोरले माधवराव पेशवे’ याचा उल्लेख करावा लागेल. वि. ज. किर्तने यांनी १८६१ साली हे लिहिले. बुकीश नाटकांनी मराठी रंगभूमीवर गद्य नाटके समृद्ध केली.

मराठी रंगभूमीच्या आरंभापासून म्हणजे १८४३ सालापासून या रंगभूमीवर ज्या नाटककारांनी, नटांनी ही रंगभूमी समृद्ध केली व रंगभूमीच्या इतिहासात ज्याची नोंद घ्यावी लागेल अशा काही नाटककार, नटांच्या स्मृती चित्ररूपाने संस्थेकडे, त्यांच्या विषयक माहिती व त्यांचे रंगभूमीवर कार्य, कालखंड या तपशिलासह चित्रग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या नोंदी आम्ही चित्ररूपाने या मांडलेल्या आहेत.

चित्र ग्रंथालय

संस्थेमध्ये १९०४ च्या सुमारास श्री. विश्वनाथ नरहर तथा भाऊसाहेब दातार यांचा प्रवेश झाला. व्यवसाय कॉन्ट्रॅक्टरचा, हौशी सुखवस्तू व स्वभावाने जिद्दी असे भाऊसाहेब एकदा दिल्लीला गेले असता तेथे काही आर्ट गॅलरीज त्यांच्या पाहण्यात आल्या. त्यामध्ये मोगल सम्राटांचे, त्यांच्या राण्यांचे स्वतंत्र व इतर अनेक चित्र संग्रहाचे त्यांना दर्शन झाले. झाले! आपल्या महाराष्ट्रात काय करता येईल! याचे विचारचक्र सुरु झाले. १९३६ चा काळ तो. आपला महाराष्ट्र नाट्य-वेडा आहे तेव्हा त्याला पोषक व संस्थेच्या ध्येयाला साजेसे कार्य म्हणजे संस्थेचा संशोधन विभाग उघडून नाट्यचित्र ग्रंथसंग्रह जमवण्याचे कार्य त्यांनी सुरु करावे. संशोधन करणे हे काम जिकीरीचे, कष्टाचे व अत्यंत खर्चाचे त्यामुळे या संकल्पनेला सुरुवातीला सभासदांचा विरोधही झाला पण त्याचे महत्व आणि उपयुक्तता कळल्यावर हा विरोध मावळला.
प्रामुख्याने मराठी रंगभूमीची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या त्या प्रसिद्ध नाट्य लेखकांचे, नटनटीचे फोटो संग्रह करण्याचे काम सुरु झाले. हे फोटो देणगी स्वरुपात जनतेकडून मिळवायचे व त्यांना समान फ्रेम संस्थेच्या खर्चाने करावयाची अशी योजना कार्यान्वित झाली. मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचे १८ फोटो, नट, नटी व ड्रॅमॅटिक प्रोप्रायटर्स अशा सर्वांचे १०७ फोटो व इतर मिळून १४० फोटोंचा संग्रह जमा झाला होता. असा हा चित्रसंग्रह उभा राहिल्यानंतर भाऊसाहेब दातारांनी थोरामोठ्यांना संस्थेत आणून हा चित्रसंग्रह दाखवायला सुरुवात केली. अशा भेटी दिलेल्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय खूपच बोलके आहेत. आज संस्थेकडे इतक्या संख्येने हा चित्रसंग्रह आहे. जुन्या काळातील बऱ्याच नाटक मंडळींचे अल्बम्ससुद्धा संस्थेच्या संग्रही आहेत. मराठी रंगभूमीचा इतिहासच या फोटोच्या द्वारे सांगता येईल. हा इतिहास आम्ही पुढे मांडलेला आहेच त्यावरून याची प्रचीती येईल.


Top

लायब्ररी

संस्थेचे एक समृद्ध नाट्यविषयक ग्रंथालय असावे या विषयास सुरुवात ही भाऊसाहेब दातार यांनीच केली. त्यांना श्री. आप्पा गोखले यांनी फारच मदत केली. त्यानंतर कै. माधवराव जोशी यांनी इंग्रजी व मराठी नाटकांची अनेक पुस्तकांची देणगी संस्थेला दिली. सन १९३५ पर्यंत ४०० इंग्रजी नाटकांची पुस्तके, मराठी जुनी व नवी नाटके ३०० व इतर वाङमय ३०० इतकी पुस्तके ग्रंथालयात होती. त्यात वाढ होत होत १९७० पर्यंत ग्रंथालयात दोन हजार नाट्यविषयक पुस्तके होती व आजमितीला या पुस्तकांचा आकडा ८ हजार पुस्तकांपर्यंत पोहोचलेला आहे. या नाट्यविषयक पुस्तकांमध्ये नाट्यतंत्र विषयक ग्रंथांचा व नाट्य संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे. या ग्रंथांचा उपयोग या विषयामध्ये पी. एच. डी. करणारे विद्यार्थी करून घेत असतात. संस्थेमध्ये पी. एच. डी. साठी संशोधन करण्यासाठी, संदर्भ ग्रंथ वाचण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. आज या ग्रंथालयाचा उपयोग होऊन पी. एच. डी. झालेले कितीतरी अभ्यासक आहेत. आज श्री. मोहन मुळे हे या ग्रंथालयाचे व्यवस्थापन कुशलतेने हाताळतात. संस्थेमध्ये असलेले दुर्मिळ नाट्य विषयक बाबी अगदी नेमकेपणाने आणि सुव्यवस्थित लावण्याची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारलेली आहे.


Top

वर्तमानपत्रातील कात्रणे

वर्तमानपत्रातील कात्रणे निरनिराळी वर्तमानपत्रे, मासिके, मासिकातून वेळोवेळी नाट्यविषयक जो मजकूर छापून येतो, तो कापून त्यांचा संग्रह बनविण्याचे काम पूर्वी श्री. आप्पा गोखले करीत असत. त्यांच्यानंतर हे काम श्री. बापूसाहेब केळ्करांनी सुरु ठेवले. त्यांच्यानंतर श्री. भास्करराव पटवर्धन यांनी ही जबाबदारी स्वीकारली व त्यांच्या नंतर आज श्री. मोहन मुळे अशा कात्रणांचा संग्रह करतात. नाट्यविषयक घडामोडींची कात्रणे संस्थेत आज उपलब्ध आहेत. रंगभूमीच्या कालखंडाचा विविध घटनांचा हा संग्रह एका अर्थाने साक्षीदारच आहे.


Top

दूरदर्शन कक्ष

संगीत नाटके, मैफिली, प्रसिद्ध लोकनाट्य, किर्तने, थोर साहित्यिकांची भाषणे, सत्कार समारंभ वगैरे ललितकलांचे साहित्य संस्थेने टेप (रेकॉर्डिंग) करून ठेवलेले आहे. अशा विविध घटनांच्या जवळ जवळ ३० स्पुल्स संस्थेच्या संग्रही आहेत.


Top

नाट्यविषयक दुर्मिळ गोष्टींचा संग्रह

मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणाऱ्या विविध नाटक कंपन्या, संस्था यांच्या नाटकाबद्दलची माहिती, जाहिराती, स्मरणिका यांचा संग्रह संस्थेकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील मराठी नाटक मंडळांच्या कार्याचे विविध तऱ्हेची टिपणे, कात्रणे, चित्रे, नट नटींचा वैयक्तिक पत्रव्यवहार, त्यांची हस्तलिखिते, काही नाटककारांच्या नाटकाची मूळ हस्तलिखिते, मोठ्या मान्यवर नटांच्या काही दुर्मिळ वस्तू, जुन्या दुर्मिळ अशा जाहिराती, रंगभूमीच्या इतिहासाचे असे अनेक महत्वाचे टप्पे या संग्रहातून पहावयास सापडतात. काही निवडक दुर्मिळ गोष्टी चित्ररूपाने पुढे मांडलेल्या आहेत.
मराठी रंगभूमीवर घडलेल्या महत्वाच्या घटना, प्रसंग, घडामोडी, याचा चित्रग्रंथालयाच्या माध्यमातून वेध घेतला जातो. फोटो, कात्रण, रेकॉर्डिंग ज्या माध्यमातून शक्य असेल त्या माध्यमाद्वारे त्याची नोंद संस्थेमध्ये ठेवली जाते हे फार महत्वाचे कार्य संस्थेच्या ‘चित्र ग्रंथालय’ या विभागाद्वारे केले जाते. मराठी रंगभूमीवर अशा नोंदी ठेवणारी संस्था अपवादानेच सापडेल.


Top

Have a question or need any help?

Please contact - 020 2448 1614